Khawale Ganpati

खवळे महागणपती ट्रस्ट

तारामुंबरी, तालुका - देवगड

इतिहास

श्री खवळे महागणपती !

हे सरदार नाना खवळे यांचे घर आहे, हे देवघर म्हणून प्रसिद्ध आहे या महागणपतीचा महोत्सव सतत ३००+ वर्ष चालु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या. जहाजांचा प्रमुख असलेल्या सरदार शिव तांडेल यांचा वंश वाढत नव्हता. मालवण येथील मालडी गावातील नारायण मंदिरात ते दररोज पुजा करीत असत. अनेक वर्षे यांना संतान होत नव्हते. या नारायण मंदिरात एक गणपतीची मूर्ती आहे. ती त्याच्या स्वप्नात आली माझा मोठा उत्सव कर तुला पुत्ररत्न होईल. स्वप्नाप्रमाणे शिव तांडेलानी छत्रपतींच्या सरदाराला शोभेल असा १७०१ मध्ये गणपती उत्सव चालु केला. त्यांना पुत्ररत्न झाले. त्यानी त्याचे नाव गणोजी असे ठेवले. १७५६ साली गणोजी विजयदुर्गवर इंग्रजांशी लढताना पकडले गेले. त्यांना शिक्षा झाली. आज हि या गणोजी सरदारांची समाधी तारामंबरी येथील खवळे घराण्याच्या शेतात आहे. आज हि परंपरेने त्या ठिकाणी दर सोमवारी दिवा, अगरबत्ती लावली जाते. याच गणोजी सरदारांची नववी, दहावी व अकरावी पिढी आज त्याच उत्साहात या महागणपतीचा उत्सव साजरा करीत आहेत.

या महागणपतीची हि काहि वैशिष्टे,
१. शेतातील साधी माती जवळ-जवळ दिड टन आणुन ती लाकडी घणाने मळुन गोळे केले जातात. या महागणपतीची मूर्ती बनविण्यास श्रावण नारळी पौर्णिमेला सुरुवात करतात. हि मूर्ती याच घरातील पुरुषांनी बनवावी लागते. बाहेरील मूर्तीकार चालत नाही. सूर्यकांत खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद, विकट, अक्षय, अनंत व चिन्मय हे बंधू हि मूर्ती बनवितात. ठराविक दिवसांचे अंतर ठेवून ती बनविली जाते. हि मूर्ती साच्या शिवाय संपूर्ण हातीच बनवितात. त्यामुळे ती संपूर्ण भरीव असते. हि मूर्ती बैठी, सहा फूट उंचीची असते.
२. गणेश चतुर्थीला या महागणपतीच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजेला बसवितात. फक्त डोळे रंगविले जातात व विधिवत पूजा होते.या वेळी उंदिर नसतो.
३. दुसऱ्या दिवशी उंदिर पूजेला लागतात. उंदिरासाठी नैवेद्य म्हणून खिर बनविली जाते.
४. तिसऱ्या दिवशी या महागणपतीचे रंगकाम सुरु होते. पाचव्या दिवशी संपूर्ण रंगवून पूर्ण होतो. संपूर्ण अंगाला लाल रंग, अंगरखा चांदिच्या रंगाचा, पिवळे पिंतांबर, सोनेरी मुकूट त्यावर पाच फणी नाग, मागे गोल कागदी पंखा, हातावर शेला अशी हि उग्र पण विलोभनीय मूर्ती असते
५. पाचव्या दिवसा पासुन सकाळी, संध्याकाळी व रात्री अशी तीन वेळा आरती केली जाते. दररोज संध्याकाळी लहान मुलाची दृष्ट काढतात तशी घरातील सुवासिनि या महागणपतीची दृष्ट काढतात. दररोज रात्री भजन करावे लागते.
६. ७ व्या, ११ व्या, १५ व्या, १७ व्या २० व्या दिवशी असे सतत रंगकाम चालु असते. शेवटचे रंग काम विसर्जनाच्या दिवशी दुपारी केले जाते. या वेळी संपूर्ण चेह-यावर लाल रंगावर पिवळे ठिपके दिले जातात. त्यामुळे त्याच्या उग्रतेत आणखीणच भर पडते. राक्षसांनशी लढणाऱ्या 'विकट' रुपाचा भास होतो. पहिले ३ दिवस सफेद, नंतर संपूर्ण रंगकाम झालेला व विसर्जनाच्या दिवशी पिवळे ठिपके दिलेला असा २१ दिवसात वेगवेगळ्या ३ रुपात दिसणारा हा जगातील पहिलाच महागणपती आहे.
७. २० वी रात्र 'जागर' किंवा “लळीत' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी पूर्वजांच्या पगड्यांची देवघरात पूजा केली जाते. त्याला जैन पूजा असे म्हणतात. रात्री एका पुरुषाला साडी नेसवुन डफ, तुणतुणे, ढोलकी, असा तमाशा फड उभा करुन नाचविले जाते. पहाटे वारी (अंगात देव येणे) खुदवली जातात. रात्री जो पुरुष साडी घालुन नाचतो त्याला पहाटेची आरती धरायला दिली जाते. या वेळी महागणपतीची व त्याची दृष्ट काढली जाते. या वेळी पावण झालेले नवस फेडले जातात, नंतर महागणपती समोर पुरुष फेर धरून नाचतात व हा कार्यक्रम संपतो.
८. विसर्जनाच्या सकाळी “खवळे” कुंटूबियातील कैलासवासी झालेल्या सर्वांना पिंडदान केले जाते. गणपती समोर पिंडदान होणारा हा जगातील पहिलाच गणपती आहे. या वेळी पंचक्रोशीतील हजारो भक्तांना महाप्रसाद दिला जातो.
९. दुपारी पावण झालेले नवस फेडले जातात व नवीन नवस बोलले जातात. वंशवृध्दी साठी हा महागणपती असल्याने मूल होण्यासाठी व लग्नासाठी हा महागणपती नवसाला पावतोच असा लौकीक आहे.
१०. या महागणपतीच्या विसर्जनासाठी २० ते २५ तगडे पुरुष लागतात. २५ ते ३० ढोलांचे पथक, लेझीम, मृदंग, गुलाल उधळत, भाल्यावर लावलेले भगवे झेंडे, तलवारी नाचवत महागणपती विसर्जनाच्या ठिकाणी आणला जातो. मिरवणुकीला हजारो भक्त सामील झालेले असतात. महागणपती विसर्जनाच्या ठिकाणी महागणपती समोर दांडपट्ट बनाटी, तलवार, लाठी काठी असे शिव कालीन मर्दानी प्रकार खेळले जातात. पुरुष फेर धरून नाचतात. विसर्जनाला पाण्यात प्रथम उंदिर नेला जातो. नंत सागाची फळी पाटाखाली घालुन महागणपती खांदयावरुन पाण्यात नेला जातो विधिवत विसर्जित केला जातो. अनेक जगावेगळी वैशिष्ठे असलेला असा हा “खवळे महागणपती” या वैशिष्ठ्यामूळेच लिम्का बुकने त्याला मान्यता दिली आहे. लिम्का बुकने मान्यता दिलेला भारतातील हा पहिलाच गणपती आहे. सर्वभक्तांना सुख, समृधी दयावी हिच त्याच्या चरणी प्रार्थना...